धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर संपूर्ण जिल्ह्यातील चित्र स्पष्ट झाले असून काँग्रेस विरुद्ध भाजप व शिवसेना असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात असणार आहे. भाजपातील बंडखोरांना शांत करण्यात अनेक ठिकाणी अपयश आले असून हे बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे धुळे जिल्ह्यात चुरशीची निवडणूक होणार आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अनिल गोटे, अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे हिलाल माळी आणि मनसेच्या प्राची कुलकर्णी यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. माधुरी बोरसे यांनी भाजपला रामराम करत उमेदवारी केली होती. मात्र, माघारीच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.
विधानसभा मतदारसंघ
शिरपूर विधानसभा, मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात गेलेले विद्यमान आमदार काशीराम पावरा विरुद्ध भाजपचे बंडखोर डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यात लढत होणार आहे. काशीराम पावरा यांना माजी मंत्री अमरीश पटेल यांची साथ असून आपण विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, तर दुसरीकडे भाजपचे ९ वर्षांपासून काम करणारे जितेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत उमेदवारी केली आहे. यामुळे या मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार आहे.
हेही वाचा - भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे मीडियावर निर्बंध, अनिल गोटेंची सणसणीत टीका
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि धर्मा पाटील यांचे चिरंजीव आणि मनसेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात लढत होणार आहे. नरेंद्र पाटील यांना मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मिळणारी सहानुभूती पाहता ही निवडणूक याठिकाणी चुरशीची होणार आहे. मात्र, विकास कामांच्या जोरावर आपलाच विजय होणार असल्याचा दावा जयकुमार रावल यांनी केला आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील आणि भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यात लढत होणार आहे. गेल्या ५ वर्षात विरोधी पक्षात असून देखील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात केलेली विकास कामेच आपल्याला विजयी करतील असा विश्वास कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे, तर राज्यात आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या विकास कामांमुळे प्रभावित झालेली जनता आपल्यालाच विजयी करेल असा विश्वास भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांनी व्यक्त केला आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघ
साक्री विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे डी एस अहिरे, भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि भाजपच्या बंडखोर तसेच धुळे महापालिकेच्या माजी महापौर मंजुळा गावित यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे डी एस अहिरे हे विद्यमान आमदार असून मंजुळा गावित यांना विजयी करण्यासाठी साक्री विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. तर मोहन सूर्यवंशी यांनी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे या मतदारसंघात जनता कोणाला विजयी करते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात; जयकुमार रावल यांची डोकेदुखी वाढणार