धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी 25 जणांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 495 झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील काही दिवसांत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. गेल्या 2 दिवसात जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग मंदावला होता, यामुळे आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले होते. मात्र, शनिवारी रात्री उशिरा तब्बल 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 495 झाली आहे. आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून धुळे शहरात मृत्यूदर अधिक होता. मात्र, सध्या ग्रामीण भागातील मृत्यूदरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत धुळे ग्रामीणमध्ये 218 रुग्ण आढळले असून त्यात 39 नवीन रुग्ण हे शिरपूर शहरातील आहेत. शिरपूर शहरात आतापर्यंत रुग्णसंख्या 127 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात टाळेबंदीत शिथिलता आल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे, तर, दुसरीकडे धुळ्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचाही आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.