धुळे - लोकसभच्या धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यात लढत होणार आहे. डॉ.भामरे हे अनुभवी खासदार आहेत, तर कुणाल पाटील हे नवखे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू काय आहेत.. पाहूया या विशेष बातमीतून.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारांनी आपल्या मतदार संघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली. धुळे लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी एकमेकांविरोधात प्रचार करत आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे उमेदवार भामरे हे अनुभवी खासदार आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील हे लोकसभा निवडणुकीतले नवखे उमेदवार आहेत. डॉ सुभाष भामरे यांच्यातील कौशल्य पाहून त्यांच्यावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच पुलवामा येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे डॉ. सुभाष भामरे हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते.
डॉ. सुभाष भामरे यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५३ रोजी झाला. त्यांनी एमबीबीएस, एमएस (ग्रांट मेडिकल कॉलेज, मुंबई) पदवी घेतली आहे.
डॉ. सुभाष भामरे यांच्या काय आहेत जमेच्या बाजू-
भामरेंचा त्यांच्या मतदारसंघात नियमित संपर्क आहे, धुळे मनमाड इंदौर रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. धुळे लोकसभा मतदारसंघातला सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील त्यांची सतत धडपड, माजी खासदारांकडून न झालेली कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात मार्गी लावली.
कमकुवत बाजू-
भाजपमध्ये भामरेंवर नाराज असणारा एक गट आहे. स्थानिक राजकारणात त्यांनी अधिक लक्ष घातल्याने त्यांच्या विरोधकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतदेखील त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.
काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील-
धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील हे या निवडणुकीत नवखे उमेदवार आहेत. मात्र, तरुण तडफदार उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते सुपुत्र असून रोहिदास पाटील यांचा ग्रामीण मोठा मतदार असून त्याचा किती फायदा कुणाल पाटील यांना होतो, हे बघणं महत्वाचं असणार आहे. कुणाल पाटील यांचा जन्म १८ सप्टेंबर १९७४ ला झाला असून त्यांचे शिक्षण बीई इन्स्टुमेंटेशन झाले आहे.
कुणाल पाटील यांच्या जमेच्या बाजू -
काँग्रेसच्या दोन्ही गटात मनोमिलन झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे आमदार असल्याने त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. स्वतःच्या शैक्षणिक संस्थांमुळे त्यांचा लोकसंग्रह प्रचंड आहे. जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून धुळे तालुक्यात जलक्रांती त्यांनी घडवली आहे.
कुणाल पाटील यांची कमकुवत बाजू -
जिल्ह्यात जनसंपर्काचा अभाव आहे. पक्षातील ठराविक लोकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी असली तरी काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचे अंतर्गत आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.