धुळे - महापालिका निवडणुकीत होणाऱ्या खर्चाचा हिशोब न देणाऱ्या १६७ जणांना विभागीय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांसह माजी नगरसेवकाचा समावेश आहे.
धुळे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब देणे उमेदवाराला बंधनकारक असते. यात नाष्टा, बॅनर, प्रचाराचे साहित्य, रॅली यावरील खर्चाचा समावेश असतो. निवडणूक होऊन महिना झाला मात्र तरीदेखील हा हिशोब न देणाऱ्या १६७ जणांना विभागीय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली आहे. यात एकही विद्यमान नगरसेवकाचा समावेश नसून स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांचा समावेश आहे. हिशोब न देणाऱ्या उमेदवारांची १९ मार्च रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे. हिशोब सादर न केल्यास ३ वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येऊ शकते.