धुळे - केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज तहसीलदार कार्यालयाजवळ आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ठोसर यांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यावेळी निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणाऱ्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे का? हे पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहे का? पोलीस बळाचा वापर का? शेतकरी न्याय मागतोय. तीन विधेयकं मंजूर केली त्याचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता ही विधेयकं का लादली? शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही, असे सवाल या निवेदनातून विचारण्यात आले आहेत.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साबीर सेठ, सेवादलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, धुळे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, महिला अध्यक्ष बानुबाई शिरसा, विद्यावर्धिनीचे संचालक अशोक सुडके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 109 कोटींची मदत जमा