धुळे - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात एकही काम केलेलं नाही. अक्कलपाडा धरणाचे काम काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहे. मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण झालेली नाही. त्यामुळे मी निवडून आल्यावर या मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवीण, असे आश्वासन धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आ. कुणाल पाटील यांनी दिले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
धुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या २९ एप्रिलला राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी संवाद साधला.
नारपार योजनेच्या विषयावर बोलतांना कुणाल पाटील म्हणाले, नारपार योजनेचे ९० टक्के पाणी आज गुजरातला देण्यात येत आहे. फक्त १० टक्के पाणी महाराष्ट्राला त्यातही फक्त मुंबईला देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या योजनेबाबत झालेल्या बैठकांना खासदार डॉ. सुभाष भामरे हे एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत, हे या मतदार संघाचं दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मतदारसंघाच्या विकासाचा अभ्यास असलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.