धुळे - निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य माणूस आपल्यासोबत होता. यामुळे विजय आपलाच होणार आहे, असा विश्वास धुळे ग्रामीणचे आमदार आणि लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. मतमोजणीच्या तोंडावर उमेदवारांना काय वाटते याविषयी ईटीव्ही भारताने उमेदवारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना धुळे ग्रामीणचे आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात कॉमन मॅन आपल्या सोबत होता. हीच माझ्या विजयाची पावती आहे. आपला एक्झिट पोलवर विश्वास नसून मतमोजणीच्या दिवशी येणारा निकाल हा खूप वेगळा असेल.
धुळे लोकसभा मतदारसंघातून आपला विजय नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतमोजणीनंतर आपण दुष्काळाच्या विषयावर काम करणार आहोत, मतदार संघातील प्रश्न जाणून घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.