धुळे - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून 16 लाख 79 हजार 942 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन यांनी पत्रकार परिषदेत केले.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान, तर 24 ऑक्टोबर 2019 ला मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
हेही वाचा -लाचखोर पोलीस हवालदाराचे निलंबन तर निरीक्षकाची तडकाफडकी बदली
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठीत करण्यात येईल.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही C-Vigil या मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर शंभर मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.