धुळे - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे धुळे येथील दौऱ्यावर आले असता त्यांच्या संवाद यात्रेत धुळ्यातील राष्ट्रवादीतील दोन्ही गट समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन प्रदेशाध्यक्षांच्या समोर राडा झाला. यावेळी जयंत पाटील यांनी दोन गटांना आपल्या विशिष्ट शैलीत शांत केले.
संवाद यात्रेत राडा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर धुळे शहरात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील हे धुळ्यात आले आहेत. धुळे शहरातील केशरानंद गार्डनमध्ये धुळे शहर आणि धुळे ग्रामीण असा एकत्र पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
शाब्दिक वाद
धुळे येथील संवाद यात्रेदरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांचे समर्थक आणि जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला. हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शिवीगाळही यावेळी करण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत पोलिसांना कार्यकर्त्यांना शांत करण्याचा आवाहन केले. यानिमित्ताने राष्ट्रवादीमध्ये असलेल्या गटातटाचे राजकारण प्रदेशाध्यक्षांसमोर आले. जयंत पाटील यांनी आपल्या मिश्कील शैलीत राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.