धुळे - दोन दिवसांपूर्वी धुळे शहरातील पांझरा नदीत पोहत असताना वाहून गेलेल्या अक्षय सोनवणे या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी नदीत तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती.
साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातील पाण्याचा पांझरा नदीत विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पूर आला होता. यातच सोमवारी नदीत पोहण्यासाठी गेलेला अक्षय सोनवणे हा (वय 23) तरुण पूरात वाहून गेला होता. दोन दिवसांपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी अक्षयचा शोध घेत होते. मात्र, त्यांना यश मिळत नव्हते. अखेर बुधवारी सकाळी अक्षयचा मृतदेह जुने धुळे भागातील पांझरा नदीत तरंगताना आढळून आला. नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने अक्षयचा मृतदेह बाहेर काढला. धुळे जिल्हा रुग्णालयात अक्षयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.