धुळे - हिंदू धर्मियांचा पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. श्रावण महिन्यात हिंदू धर्मीय मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात. तसेच बुधवारी संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव सुरू होता. हा आनंद उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे धुळे जिल्हा परिषदेतील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मटणावर ताव मारत 'आधी पोटोबा, मग विठोबा' ही म्हण सार्थ ठरवत, या मंडळींनी चक्क तीन बोकडांचे मटण फस्त केले. तृप्तीची ढेकर दिल्यानंतर श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करत जय श्रीरामचा जयघोष केला.
एकीकडे श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी हा दिवस प्रभू श्रीरामाच्या स्मरणात व्यतीत करण्याचा आणि मंगल दिनी रांगोळ्या काढून गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे धुळे जिल्हा परिषदेचे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पार्टीत दंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
गोदुर गावाजवळ साई लक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. मात्र या लॉनच्या संचालकांनी अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्याने तसेच श्रावण मासानिमित्त आपण मटणाचे जेवण करू देत नसल्याचे सांगितले होते. यामुळे या लॉन्सच्या प्रवेशद्वारा लगत असलेल्या शेतातील झोपडीत जिल्हा परिषद सदस्यांनी मटणावर ताव मारला.
विशेष म्हणजे सदस्यांसह अधिकारी आणि त्यांची मुले नातेवाईक आणि पती अशा सुमारे दीडशे जणांनी 3 बोकडाचे मटण फस्त केल्याची माहिती एका सदस्याने दिली. या मटनाच्या पार्टीनंतर सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र आधी पोटोबा झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामांचा जयघोष करीत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला.
राम मंदिराचे निर्माण हा भाजपाच्या अजेंड्यावरील मुख्य आणि प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्याच राम मंदिराच्या निर्माण कार्याला काल जल्लोषात सुरुवात झाली. मात्र, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने पार्टी केल्याने हा टीकेचा विषय ठरला आहे.