धुळे - लोकसभा मतदारसंघातील बागलाण हा विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात मराठा पाटील समाजाचा सर्वाधिक प्रभाव आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत डॉ सुभाष भामरे आणि कुणाल पाटील हे दोन्ही उमेदवार मराठा-पाटील समाजाचे आहेत. यामुळे या मतदारसंघात मतविभाजन झाले तर, त्याचा सर्वाधिक फायदा कुणाला होईल, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी बागलाण हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार संघात येतो. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळत आलेले आहे. गेल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बागलाणमधून डॉ. सुभाष भामरे यांना सर्वाधिक अर्थात ८६ हजार मते मिळाली होती. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी अमरीश पटेल यांना ५७ हजार ४६३ मते मिळाली होती.
विशेष म्हणजे या मतदारसंघात मराठा पाटील समाजाचा प्रभाव आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. सध्या या मतदारसंघात एकूण २ लाख ७५ हजार १९८ मतदार आहेत. पाटील समाजाचा प्रभाव या मतदारसंघात असला, तरी याठिकाणी विकास कामांची बाजू उमेदवाराला विजयी करण्यासाठी निर्णायक ठरेल यात शंका नाही.