धुळे : राज्यात मागील काही दिवसांपासून धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या दरबारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने धार्मिक वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री महाराज हे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याचा आरोप केला होता. याविरोधात हिंदू धर्मातील संत महंतांंनी धीरेंद्र शास्त्री महाराजांचे समर्थन करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. अंनिसचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अविनाश पाटील यांनी यासंदर्भात ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला आहे.
ही मागणी दिशाभूल करणारी : ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना अविनाश पाटील म्हणाले की, जादूटोणाविरोधी कायदा रद्द करणारी मागणी ही दिशाभूल करणारी आहे. जादूटोणाविरोधी कायदा हिंदू धर्माच्या विरोधात असा आरोप केला जातो. खरेतर हा आरोप चुकीचा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जादूटोणा विरोधी कायदा व त्याच्याविरोधात अफवा पसरवत असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
नागरिकांनी सावध झाले पाहिजे : अंधश्रद्धेचा पुरस्कार करून देवा धर्माच्या नावावर मतांचा अजेंडा मिरवणाऱ्यांविषयी भारतीय नागरिकांनी सावध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण देशाचा स्वातंत्र्यमहोत्सव साजरा करत आहोत, त्याप्रमाणेच काही दिवसात आपण संविधानाचा अमृतमहोत्सव देखील साजरा करणार आहोत. यामुळे भारतीय संविधानावर चालणाऱ्या या देशातील नागरिकांनी सावध झाले पाहिजे.
दहा राज्यात कायदा लागू होणार? : जादूटोणाच्या विरोधी कायदा हा महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील किमान दहा राज्यात लागू करण्यात यासाठी आमचा पाठपुरवठा सुरू आहे. निवडणूकीच्या राजकारणात राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत, यामुळे संविधान प्रणालीवर आधारित चालणाऱ्या देशातील राज्यकर्त्यांनी या कायद्यावर विरोध करणाऱ्यांवर आळा घातला पाहिजे.
जादूटोणाविरोधी कायदा : अविनाश पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदाचा 18 वर्षांपासूनचा संसदीय प्रवास आहे. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रयत्नांमुळे हा कायदा लागू करण्यात आला. दाभोलकर 20 ऑगस्ट रोजी शहीद झाल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी 22 ऑगस्ट रोजी जादूटोणाविरोधी कायदा लागू केला होता. या कायद्यावर आधारित आजपर्यंत अनेक प्रकरणे समोर आली. आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अनेक जणांवर आजपर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन : नाशिक येथील रामकुंड परिसरात दुपारी साधू महंत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी सर्व साधू महंत, नागा संन्यासी, हिंदुत्ववादी संघटना, पुरोहित संघ आणि धर्मशास्त्र अभ्यासक हे सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाला एक निवेदन देणार आहेत. त्या माध्यमातून ते राज्य सरकारला अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
हेही वाचा : Anti Witchcraft Law : अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा, नाशिकमधील साधू महंत आज करणार आंदोलन