धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या, असा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्हापरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या. भाजप सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, मी हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, असेही गोटे म्हणाले.
हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी
दरम्यान, भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. धुळे जिल्हा परिषदेवर भाजप वर्चस्व प्रस्थापित करेन. 15 पैकी 11 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला आहे.