धुळे - भाजपचे दिवे विझल्याने त्यांनी लोकांना दिवे लावण्यास सांगितले आहे. मात्र, जनतेने अशा कोणत्याही आवाहनाला बळी पडू नये, भाजपने दिवे लावण्यास सांगण्याऐवजी उपाययोजना कराव्यात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपला लगावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रविवारी रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले आहे. यावर गोटे यांनी यांनी टीका केली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालनदेखील आपल्याला करायचं आहे, असे मोदी म्हणाले.
कोरोना आजाराबाबत सरकार गंभीर नसून यावर उपाययोजना करण्याऐवजी ते लोकांना थाळ्या वाजवण्यास, दिवे लावण्यास सांगत आहेत. मात्र, दिवे लावण्याने कोणताही फरक पडणार नसून याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे लोकांनी या आवाहनाला बळी न पडता स्वतः ची काळजी घ्यावी, असे आवाहन गोटे यांनी केले आहे.