धुळे - अक्षय तृतीया या सणाचा खान्देशात गोडवा वाढवण्याचं काम खापराची पुरणपोळी करते. एरवी सर्वजण ताव्यावर तयार करण्यात आलेली छोटीशी पुरणाची पोळी पसंत करतात. मात्र, खान्देशातील मातीच्या खापरावर बनविण्यात आलेली ही पुरणपोळी एकदा चाखली की मग व्यक्ती गोड पदार्थात या पुराणपोळीलाच प्रथम पसंती देतो. देशा-विदेशात गेलेले खान्देशातील चाकरमाने खास आखाजी म्हणजेच अक्षय तृतीयेला ही खापराच्या पुरणपोळीचा स्वाद चाखण्यासाठी आपल्या मायभूमीत येतात. यावर्षीदेखील कोरोनाची भिती असली तरी प्रत्येक खान्देशी कुटुंबीय हा सण साजरा करीत आहे.
खान्देशातील आखाजी सण काय -
देशातील प्रत्येक प्रांताचे स्वतःची अशी संस्कृती आहे. आपआपल्या संस्कृतीत त्यात भागात महिलांसाठी खास सण उत्सव वर्षभर गुंफण्यात आले आहेत. खान्देशातील महिलांसाठी असाच एक सण साजरा आहे, ज्यात महिलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. अहिराणी भाषेच्या या प्रदेशातील सण, उत्सव ह्याची बातच वेगळी आहे. खान्देशी लोकजीवनातील "आखाजी " हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच अक्षयतृतीयेला खान्देशात "आखाजी" हा सण साजरा केला जातो. सासरी गेलेल्या महिला या सणासाठी आपल्या माहेरी परततात. आपल्या आई, बहिण, मैत्रिणी यांच्यासोबत मनसोक्त गप्पागोष्टी करतात. वसंताच्या नव्या बहराचे स्वागत पारंपारिक गीतांनी करत झोक्यावर हिंदोळे घेत आनंद साजरा करून महिला आपल्या सासरचा क्षीण घालाविण्यासाठी याच काळात वेगवेगळे परमापारिक खेळही खेळतात. झोक्यावर बसून अहिराणी बोलीतील गीत गात एका वेगळ्या स्वातंत्र्याचा अनुभव खादेशाच्या भगिनी या उत्सवात घेतात.
हेही वाचा - आमराईत नटली विठु-रखुमाई; गाभाऱ्यात 6500 हापूस आंब्यांची मनमोहक आरास
पूर्वजांचे केले जाते स्मरण -
आखाजीलाच चैत्र गौरी उत्सव साजरा केला जातो. शंकर आणि गौरीच्या भेटीची गीते या दरम्यान गाईली जातात. विशेष म्हणजे आखाजी सण साजरा करताना वयाच्या मर्यादा गळून पडतात आणि सर्व महिला अगदी एक समान आणि समवयस्क आहे, अशा पद्धतीने एकमेकांची सुख-दु:ख एकमेकाशी गीताच्या माध्यमातून व्यक्त करतात. आखाजीलाच खान्देशात नववर्षाची सुरुवात होते. याच दिवशी सालगडी ठरवले जातात. खरिपाच्या पेरणीची तयारीही याच सणानंतर सुरू केली जात आहेत. भविष्यात फुलणाऱ्या नव अन्कुरांची बीज याच आखाजीला खान्देशवासीय आपल्या मनात पेरतात. आपल्या पूर्वजांचे स्मरण याच आखाजीला केले जाते. त्यासाठी डेरग भरण्याची प्रथा आहे. एक मोठे आणि एक छोटे माठ घेतले जाते. त्यात पाणी भरून आणि खरबुजाचा प्रसाद देवून पंचपक्क्वान्न तयार करुन आखाजीला आपल्या पूर्वजांना नैवेद्य दिले जाते.

गेल्या दोन वर्षापासून खान्देशातील आखाजी या सणावर कोरोनाचे सावट असले तरी छोटे खाणे पद्धतीने हा सण प्रत्येक गावात घरात साजरा होत आहे. कोरोना लवकर जावो आणि माहेरवाशिणींना या सणाचा आनंद पुन्हा जोमाने घेता येवो, अशा शुभेच्छा खान्देशातील महिलांनी दिल्या आहेत.
हेही वाचा - सराफ बाजाराला कडक निर्बंधाचा फटका; अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर कोट्यवधीची उलाढाल ठप्प