धुळे - बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याचा खटला धुळे न्यायालयात सुरु आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल ७ जूनला लागणार आहे. निकाल पूर्ण लिहून न झाल्याने तसेच काही संशयित हजर नसल्याने हा निकाल लांबणीवर पडल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी हा निकाल घोषित करण्यात येणार होता. मात्र आता ७ जून रोजी काय निकाल लागणार आहे. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याचा खटला धुळे न्यायालयातील न्यायमूर्ती सृष्टी नीलकंठ यांच्या न्यायलायसमोर सुरु आहे. १ जानेवारी २०१४ पासून ४५ कोटी रुपयांच्या अपहाराचा हा विशेष खटला धुळे न्यायालयात सुरु असून या घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यसह ४९ संशयित आरोपी आहेत. या खटल्यातील युक्तिवाद दोन्ही पक्षाकडून पूर्ण झाला असून या खटल्याचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात येणार होता. न्यायमूर्ती सृष्टी निळकंठ यांच्या न्यायालयात कामकाज पार पडले. मात्र त्यावेळी ४९ संशयित आरोपींपैकी ४३ संशयित हजर होते. अन्य संशयित गैरहजर असल्याने आणि निकाल पूर्ण लिहून न झाल्याने हा निकाल ७ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान न्यायालयाने गैरहजर असणाऱ्या संशयित आरोपींच्या वकिलांना पुढील तारखेला संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. ७ जूनला काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.