धुळे - शहरातील मुख्य कोविड हॉस्पिटल असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात तब्बल सहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 132 वर पोहोचली असून मृतांमध्ये 44 ते 45 वर्षांच्या रुग्णांचा समावेश असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. रुग्णालय प्रशासन कोरोनाबाधितांचा मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहरातील शनी नगर येथील 44 वर्षे पुरुष, गोपाळ नगर येथील 65 वर्षे पुरुष, देवपूर येथील 48 वर्षे पुरुष तसेच धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील 80 वर्ष वृद्ध, देऊळ येथील 65 वर्षे स्त्री आणि कुसुंबा गावातील 45 वर्ष स्त्री, अशा सहा रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 132 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये धुळे शहरातील 66 आणि ग्रामीण भागातील 66 रुग्णांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेंटरमध्ये रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. मृत्यू रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. औषधांची खरेदी करून रुग्णांचे प्राण वाचवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, रुग्णालयात 40 ते 45 वर्षीय रुग्णांचा मृत्यू होत असल्याने याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 559 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 2 हजार 568 पूर्ण मुक्त झाले आहेत, तर बुधवारी 120 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.