धुळे - १० वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. धुळे जिल्ह्याचा या वर्षी १० वी चा निकाल ७७.११ टक्के इतका लागला आहे. इयत्ता ११ वी च्या प्रवेश प्रक्रियेला २१ जून पासून सुरुवात होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरु झाली आहे.
नऊ दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झालेला असून, विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. धुळे जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २४ हजार ८४० जागा आहेत. यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात १८ हजार ९६० तर खाजगी, विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार ८८० जागा आहेत. विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे आहे.
२१ तारखे पासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८ जून जाहीर झाला. परीक्षेसाठी २८ हजार ८८२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ७७.११ एवढी होती.जिल्ह्यात यंदा ऑफलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात ११ वीसाठी २२० अनुदानित तुकड्यांमध्ये तब्बल १८ हजार ९६० जागा आहेत. त्यात १२ हजार ३२० जागा कला शाखेच्या, ४ हजार ८४० जागा विज्ञान शाखेच्या, ७६० जागा वाणिज्य शाखेच्या आहेत. याशिवाय १ हजार ४० जागा संयुक्त शाखेच्या आहेत. ७१ विनाअनुदानित तुकड्यांमध्ये एकूण ५ हजार ८८० जागा आहेत. त्यात कला शाखेच्या १ हजार २८० जागा, विज्ञान शाखेच्या ४ हजार ३२० जागा, वाणिज्य शाखेच्या २८० जागा आहेत.