चंद्रपूर - जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या आठवड्यात दोन जणांचा खून झाल्याच्या घटनेनंतर आज पुन्हा मनोज अधिकारी या व्यक्तीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराजवळील कोसारा म्हाडा कॉलनी परिसरातील एका फ्लॅटमध्ये मनोज अधिकारी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मनोजने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राजकीय वादातून किंवा प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलीस गुप्तता पाळताना दिसत आहेत.
या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगाली कॅम्प येथील निवासी मनोज अधिकारी याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तो राजकारणात सक्रिय होऊन तशी तयारी देखील सुरू केली होती. त्याचा येथीलच एका स्थानिक राजकीय नेत्याशी वाद होता.
दरम्यान, कालपासून मनोज घरी परतला नव्हता. घरच्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. आज दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये मनोजचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. हा खून प्रेम प्रकरण किंवा राजकीय वर्चस्वातून घडल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. ती निवळण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते. या प्रकारच्या तपासात पोलीस कमालीची गुप्तता पाळताना दिसून येत आहेत. नवे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पदभार घेतल्यानंतर चंद्रपूर शहरातील ही खुनाची तिसरी घटना आहे. साळवे यांनी ही वाढती गुन्हेगारी थांबवण्यात तातडीने पाऊले उचलणे अपेक्षित आहे. अन्यथा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास जास्त वेळ लागणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.