चंद्रपूर - कोरोनामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागला आहे. बड्या कंपन्यांत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्यांना कधी आपल्यावर बेरोजगारीची वेळ येणार हे स्वप्नातही वाटले नसेल. पण, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे, असे झाले. यात अनेकांना नैराश्याने ग्रासले. यामुळे काहींनी मृत्यूला देखील कवटाळले. पण, काहींनी हे नैराश्य झटकून नव्या उमेदीने नव्या जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. त्यातीलच एक म्हणजे पलाश जैन हा युवक. मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या पलाशने कोरोनाच्या काळात नोकरी गमावली आता तो इडली विकून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्याची जिद्द परिस्थितीसमोर हताश झालेल्या हजारो युवकांना नवी उमेद देणारी ठरणार आहे.
कोरोनामुळे अनेक जणांनी रोजगार गमावल्याने त्यांनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तुकुम येथील एसटी वर्कशॉपसमोर अशा अनेकांनी आपली दुकाने मांडली होती. हे सर्व पलाश बघत होता, त्यांना बघून त्यालाही नवी दिशा मिळाली. दिवसभर हे विक्रेते येथे राबत असत मात्र त्यांच्या खाण्याची कुठलीही सुविधा नव्हती. कारण सर्व उपहारगृह आणि नाश्त्याचे दुकान बंद होते. ही संधी पलाशने हेरली आणि त्याने घरी बनवलेली इडली पार्सल विकणे सुरू केले. ते ही अवघ्या 20 रुपयांत पाच इडली व चटणी विकू लागला.
नाशिक, पूणे, औरंगाबाद भागात तो राहीला आहे. तिथे सकाळी गर्दीच्या ठिकाणी जावून नाश्ता विकणाऱ्यांची पद्धत आहे. हीच पद्धत त्याने चंद्रपुरात सुरू केली. सुरूवातीचे चार दिवस प्रतिसाद न मिळाल्याने केलेल्या इडल्या कुटुंबीयांनाच खाव्या लागल्या. मात्र, त्याने हार मानली नाही. पहाटे तीन वाजता उठून इडली तयार करायची आणि सकाळी सहा वाजता भावासोबत ग्राहकांच्या शोधात निघायचे. ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरली.
सध्या त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छतेकडे त्याचे कटाकक्षाने लक्ष असते. आता तो रूग्णालय, छोटे व्यावसायिक यांना इडली विकत आहे. कुटुंबाला काही हातभार लागावा, यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. इतके शिकून इडली विकायचे काम करावे लागत असल्याने तो खूश नाही. पण, निराश न होता कुटुंबियांना आर्थिक हातभार लावत असल्याने तो समाधानी आहे. कोरोनाने आपल्याला जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. नोकरी गमावलेल्या अभियंता पलाशची ही सुरुवात छोटी वाटत असली तरी भावी उद्योजकाची बीजे याच कृतीत दडली असतात अशा दाखल्यांनी आपला इतिहास भरून पडला आहे. त्यामुळे पलाश ही भरारी नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
हेही वाचा - आरोग्य सेतू अॅपमुळे मुंबईहून आलेला युवक चंद्रपूरमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह