चंद्रपूर - आजच्या एकविसाव्या शतकातही गृहिणी म्हणजे 'चूल आणि मूल'ची संकल्पना बदललेली नाही. फक्त त्याचे रूप काहीसे आधुनिक झाले आहे. मुले झाली की स्त्रीचे स्वतःच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होते. तिचे स्वप्न, तिच्या आकांक्षा या दुय्यम होत जातात. हळूहळू स्त्री आपला आत्मविश्वास गमावून बसते. आपल्या या बेड्या तोडणे स्त्रियांसाठी सोपे नसते. आपल्यासह तिला अनेकांची साथ व पाठबळ आवश्यक असते. याच बेड्या तोडून चंद्रपूरच्या कन्या शिल्पा चिंतलवार-आडम ( Shilpa Chintalwar Adam story ) यांनी मिसेस इंडियाचा ( misses india 2021 ) किताब मिळविला आहे.
शिल्पा चिंतलवार यांचा जन्म चंद्रपुरात ( Shilpa Chintalwar story ) झाला. त्यांचे वडील हे नझुलच्या कार्यालयात सर्व्हेअर होते. शिल्पा यांचे उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात तर पदवी त्यांनी एफईएस महाविद्यालयातून प्राप्त केली. यानंतर शिल्पा यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. येथे त्यांनी फॅशन डिझाइन, हॉर्टीकल्चर या विषयात पदवी ( Women day special story ) मिळवली. चंद्रपुरात असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून सहभाग नोंदवला. मग ती दांडियाची स्पर्धा असो रोटरी क्लबचा कार्यक्रम असो की महाविद्यालयीन या सर्व कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया भक्कम झाला होता. त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. याच दरम्यान त्यांचे लग्न जुळले.
हेही वाचा-Nitesh Rane On Raid : राहुल कनाल नाईट लाईफ गॅंगचा सदस्य - नितेश राणे
घरच्यांचे भक्कम पाठबळ
शिल्पा यांच्या सासरचे सर्व उच्चशिक्षित आहेत. बहुतेक जण कुटुंबातील लोक वकिली करत आहेत. मात्र शिल्पा यांना त्यांनी कुठल्याही गोष्टी करण्यासाठी भाग पाडले नाही. शिल्पा यांना जे करायचे आहे यासाठी घरचे सर्व प्रोत्साहन देतात, असे शिल्पा सांगतात. पती, माहेरच्या आणि सासरच्या पाठबळामुळे अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे करता आल्याचे शिल्पा सांगतात.
हेही वाचा-CNG Rate Hike In Nagpur : नागपुरात सीएनजीच्या दरात चार दिवसात 20 टक्क्यांची दरवाढ
कोरोनाच्या काळात बनली युट्युबर
कोरोनाच्या काळात सर्व जग ठप्प झाले होते. चार भिंतीच्या आत राहूनच हे जग चालत होते. याच काळात नवनव्या संकल्पना भक्कमपणे रुजू झाल्या. वर्क फ्रॉम होम, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा अनेक गोष्टी सुरू व्हायला लागल्या. याच वेळी अनेकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे महत्व लक्षात आले. शिल्पा यांनीही आपले स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले. लाइफस्टाइलवर त्या व्हीडिओ तयार करायच्या. या माध्यमातून त्या लोकप्रिय झाल्या आहेत.
20 वर्षांनंतर फॅशन विश्वात
युट्युबच्या आधारावर शिल्पा यांना एक संधी चालून आली. इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट या संस्थेकडून मिसेस इंडिया ही स्पर्धा आयोजित केली गेली. त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांना मिळाले. 20 वर्षांपूर्वी त्यांनी फॅशन डिझाइनमध्ये शिक्षण घेतले होते. मात्र मॉडेलिंग क्षेत्रात त्या कधीच आल्या नाहीत. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली. यात तब्बल अडीच ते तीन हजार गृहिणींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी शेवटच्या 55 मध्ये त्यांची निवड झाली. यानंतर पाच आणि या पाचमधून मिसेस इंडियाचा किताब शिल्पा चिंतलवार-आडम यांनी जिंकला.
राष्ट्रभाषेची निवड करून जिंकला किताब
भारतात इंग्रजीला अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः फॅशन स्पर्धेत इंग्रजी येत नाही त्यांना तितके महत्व दिले जात नाही. मात्र ही संकल्पना शिल्पा यांनी खोडून काढली. आपण कुठल्या भाषेत नेमके व्यक्त होऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. हे हेरून शिल्पा यांनी राष्ट्रभाषा हिंदीला प्राथमिकता दिली. याच भाषेत त्या व्यक्त झाल्या. मात्र, यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. हिंदी साहित्य, त्याचे व्याकरण, भाषेचे उच्चार यावर त्यांनी मेहनत केली. त्यांच्या भाषेच्या हातखंड्यामुळे परीक्षक प्रभावित झाले. त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले.
अमेरिकेत होणार मिसेस वर्ल्ड स्पर्धा-
आता शिल्पा या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेत जाणार आहेत. मियामी येथे ही स्पर्धा होणार आहे. शिल्पा यांचा हा प्रवास अनेक गृहिणींना जगण्याची नवी उमेद देणारा आहे.