चंद्रपूर - चंद्रपूरपासून काही किलोमीटर अंतरावर विदर्भातील सर्वात मोठा प्राचीन लोहकारखाना (Ancient Iron Factory) आढळला आहे. हा कारखाना आठशे वर्षांपूर्वी परमार काळातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंद्रपूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर घंटाचौकी (Ghanta Chauki Village) नावाचे खेडे आणि प्राचीन प्रसिद्ध शिव मंदिर (Shiv Temple) आहे. याच मंदिराजवळ तब्बल १ किमी परिसरात लोह अवजारे बनविण्याचा प्राचीन कारखाना येथील भुशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांना आढळला आहे. हे मंदिर आणि इतर मंदिरे बांधतेवेळी दगड फोडण्यासाठी लागणारी छन्नी आणि इतर अवजारे बनविण्यासाठी मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळले आहे. हा लोह कारखाना ११व्या किंवा १२ व्या शतकातील परमार राज्यांच्या काळातील असल्याचे मत पुरातत्व अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
जवळजवळ १५ वर्षापूर्वी चोपणे यांना हे स्थळ आढळले होते. परंतु तेथे केवळ गाळलेल्या लोखंडाचे तुकडे आढळत होते. काहीही वस्तू आढळल्या नव्हत्या, परंतु मागील वर्षी लॉकडावून काळात तिथे सविस्तर सर्वेक्षण आणि थोडे उत्खनन करून पाहिले असता गाळलेल्या लोखंडाची असंख्य लहान-मोठी तुकडे, लोखंडाची अवजारे बनविण्यासाठी दोन छीद्राची अनेक मातीचे साचे सापडले. अश्या प्रकारची विविध काळातील लोह कारखाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळली आहेत, परंतु 1 किमी परिसरात पसरलेला हा सर्वात मोठा प्राचीन लोह कारखाना आहे. बहुदा येथून बनविलेली छन्नि आणि अवजारे इतर ठिकाणी दगड फोडून मंदिरे आणि वास्तू बांधण्यासाठी वापरली जात असावी. पुढील काळातील राज्यांनी सुद्धा येथील लोहखडकापासून अवजारे बनविली असण्याची शक्यता आहे. अजून इथे नाणी किंवा इतर ऐतिहासिक पुरावे मिळाले नाही परंतु पुढील सविस्तर संशोधनाअंती आणि मिळणाऱ्या पुराव्याच्या आधारे या प्राचीन वारशाची अचूक माहिती समोर येईल.
शिव मंदिराचे वैशिष्ट्य - घंटाचौकीचे हे शिव मंदिर नागरी स्थापत्य शैलीनुसार ११ / १२ व्या शतकात राजां जगदेव परमार (१०९५-१९३४ ) ह्याच्या काळात बांधले गेले होते. परमार राजे हे शिवभक्त असल्यामुळेच त्यांनी आजच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. त्यात प्रसिद्ध मार्कडा मंदिर समूह , सिद्धेश्वर मंदिर समूह, गडचांदूर येथील मंदिर समूह, जुगाद चे मंदिर आणि भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर लगह बांधले होते.
हेही वाचा - World Heritage Day 2022 : आज जागतिक वारसा दिन; वाचा काय आहे यावर्षीची थीम
लोह कारखान्याचा उपयोग - या सर्व मंदिरांच्या बांधकामासाठी विविध आकाराचे दगडांना आकार देण्यासाठी छन्नी आणि इतर अवजारे लागत असत. अवजारांसाठी प्राचीन काळात लोह खनिज असलेल्या दगडापासून भट्टी च्या माध्यमाने तरल लोखंड तयार केले जात असे. या तरल लोखंडाला साच्यात टाकून विशिष्ट आकाराची अवजारे बनविली जात असे. त्यात छन्नी, हातोडे यांचा समावेश असत. परंतू ह्यासाठी लोह खनिजे असलेल्या ठिकाणाचा शोध घेवून तिथे अश्या दगडाना भट्टीत उच्च तापमानात तापवून तरल लोह बनविली जात ही तरल धातू योग्य मापाच्या साच्यात ओतून अवजारे बनविली जात. आजचा लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अश्या लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. बहुदा यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडले असावे. याच परिसरातील ऐतिहासीक आणि भौगोलिक खडक प्रा. सुरेश चोपणे ह्यांच्या अश्म संग्राहलयात ठेवलेली आहेत.
येथील प्रसिद्ध शिव मंदिराच्या दक्षिणेला पूर्व-पश्चीम रेषेत १ कीमी परिसरात लोखंडी अवजारे बनविण्याच्या ३० मोठ्या लोह खनिज गाळन्याच्या भट्ट्या आढळल्या. जवळच नाला असल्याने तेथील पाण्याचा वापर केला जात होता. याच ठिकाणी आजही लोह खनिज असलेले हजारो खडक आणि लोह तुकडे आढळतात. लोखंडाला तापवून तरल लोखंड ठेवण्यासाठी आणि अवजारे बनविण्यासाठी लागणारी दोन छीद्राची ( ५ इंच लांब आणि १ इंच रुंदीची ) मातीची अनेक साचे उत्खननात सापडली. उरलेले लोखंड आजही मोठ्या प्रमाणात इथे पडलेले आहे. या लोखंडाची वैशिष्ट्य म्हणजे आजही त्याला जंग लागलेला नाही त्यामुळे हे अवजारे चांगल्या धातूची आणि अतिशय मजबूत अशी बनविली गेली. इथे प्रयत्न करूनही बनविलेली अवजारे सापडली नाही, त्यासाठी येथे सविस्तर अध्ययन आणि उत्खनन करण्याची गरज आहे.
घंटाचौकी आणि लोहारा नावाची पार्श्वभूमी - १५ वर्षापूर्वी मंदिराचे मागील बाजूला पडलेल्या घरांची माती आणि मडक्यांची तुकडे आढळली होती, त्यावरून इथे कामगारांचे / लोहारांचे गाव असावे, तेच गाव पुढे घंटाचौकी आणि लोहारा म्हणून प्रचलित झाले असावे. घंटाचौकि मंदिर परिसरात आता जंगल झाले असल्याने आणि वनविभागाची अनेक कामे, खोदकामे झाली आणि होत असल्याने येथील वस्तीचे अनेक मौल्यवान पुरावे नष्ट झाले आहेत. या स्थळाचे सविस्तर उत्खनन आणि संशोधन झाल्यास अनेक प्राचीन रहस्य आणि पुरावे सापडू शकतात. पुरातत्व विभागाने आणि विद्यापीठ संशोधकांनी इथे सविस्तर संशोधन, अभ्यास करून ८०० वर्षां पुर्विचा इतिहास पुढे आणावा आणि अश्या वारसा स्थळांचे संरक्षण करावे असे आवाहन जागतिक वारसा दिनानिमित्ताने प्रा सुरेश चोपणे यांनी केले आहे.
हेही वाचा - जागतिक वारसा दिन : मराठ्यांच्या राजधानीत पाश्चात्य धाटणीची दगडी इमारत..!