चंद्रपूर - काँग्रेसने आदिवासी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची दखल आता महिला आयोगाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँगेसचे लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. यासाठी ३० तारखेला त्यांना मुंबईच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
राजुरा येथील नामांकित शाळेतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची यावर निगराणी आहे. आदिवासी वसतिगृहाच्या संस्थेचे अध्यक्ष हे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आहेत. या प्रकरणाचा आधीच तपास सुरू असताना काँग्रेसच्या आमदारांनी आततायीपणा करीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सुभाष धोटे यांनी मुलींचे पालक हे आर्थिक मदतीच्या आमिषाने तक्रारी करीत असल्याचे लज्जास्पद वक्तव्य केले. विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबीचे बेजबाबदारपणे समर्थन केले. यावेळी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर हे सुध्दा उपस्थित होते. या संबंधीच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येताच तीव्र जनक्षोभ उडाला. आदिवासी समाजाने अनेक ठिकाणी मोर्चे काढले. हे बघताच वडेट्टीवार आणि धोटे यांनी या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली. मात्र, आदिवासी समाजाचा हा उद्रेक अजूनही कायम आहे.
याच प्रकारात काँग्रेसला महिला आयोगाचा फटका बसला आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून बाळू धानोरकर, विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांना समन्स बजावला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना असे वक्तव्य करणे हे पालकांच्या हेतुवर संशय घेणारे आहे. अल्पवयीन मुलींची ही अवहेलना आहे, या शब्दात या नोटीसमध्ये काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. या संबंधी ३० एप्रिलला स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे.