चंद्रपूर - "आमच्या गावाला जोडणारा रस्ता नाही. पुराचा आम्हाला वारंवार फटका बसतो. त्यामुळे पक्क्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही आमदार बंटी भांगडिया यांना वारंवार निवेदने दिली. मात्र, त्यांनी आमच्या या तक्रारींना केराची टोपली दाखवली." असा संताप पुराने त्रस्त असलेल्या चिखलपार या गावातील महिलांनी व्यक्त केला.
चिखलपार या गावाला सोमवारी पुराने वेढले होते. उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे येथे दुपारपासूनच बचावकार्य सुरू झाले. सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. मात्र, याच वेळी आमदार भांगडिया हे स्वतःच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. ते गावात फिरकले सुद्धा नाही. या सर्व पूरग्रस्तांना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले. सध्या सर्व पूरग्रस्त येथेच असून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री भांगडिया शेतकरी भवन येथे आले होते. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला समोर जावे लागले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही भांगडीया यांना रस्त्याची वारंवार मागणी करीत आहोत. यासाठी त्यांना अनेक निवेदने दिली. हळदी-कुंकू कार्यक्रमात त्यांना आवर्जून आठवण करून दिली. तरीही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आमच्या गावाचे पाच वर्षे अस्तित्व नसते. मग अचानक निवडणूका आल्या की निव्वळ आश्वासन दिले जाते. असे सांगत या महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे.