चंद्रपूर - पतीवर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करित पत्नीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालूक्यात घडली आहे. विषप्राशन केलेल्या महीलेला रुग्णालयात घेऊन जाण्याचे सौजन्य जिवती पोलीसांनी दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
विषप्राशन करणाऱ्या महिलेची आई अवैध दारूची विक्री करते, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महीलेच्या घरी छापा टाकला. घरात दारुसाठा आढळून आला. पोलीसांनी दारू साठा जप्त केला. ज्या महीलेच्या घरी दारुसाठा आढळला. त्या महिलेवर गुन्हा दाखल न करता पोलिसांनी तिच्या जावयाच्या नावे गुन्हाची नोंद केली. "दारू माझ्या घरात सापडली, त्यामुळे मला अटक करा. कारवाई करा. यात माझ्या जावयाचा काहीच दोष नाही, माझ्या मुलीसोबत वेगळा राहतो" अशी विनवणी सासूने ठाणेदाराकडे केली. मात्र, पोलीसांनी जावयावर गुन्हा दाखल केला. दोष नसतांना पतीवर गुन्हा दाखल झाला, हे बघून व्यथीत झालेल्या पत्नीने पोलीस स्टेशन गाठले. पतीवर गुन्हा का दाखल केला, असा जाब विचारत पत्नीने पोलीस ठाण्यातच विष प्राशन केले. ही घटना घडली तेव्हा ठाणेदार हजर होते. विषप्राशन केलेल्या महीलेला तत्काळ रुण्णालयात नेण्याचे सौजन्य पोलीसांनी दाखविले नाही.