चंद्रपूर - वेकोली व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आज एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. आज लालपेठ खाणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कंपनीच्याच ट्रकच्या धडकेत खाण परिसरातच मृत्यू झाला. विनोद शिरभैये (५९) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार होते.
वाहनांची नीट दुरुस्ती होत नसल्याने अनेक वाहने भंगार झाली आहेत. तरी या वाहनांचा उपयोग कोळसा खाणीत केला जातो. अशावेळी अनेक अपघात होतात. अशाच अपघात शिरभैये यांचा जीव गेला.
वेकोलीच्या कोळसा खाणीत यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. काही लोकांना यात जीवही गमवावा लागला. वेकोली व्यवस्थापन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. अनेकांच्या पदानुसार काम देण्याऐवजी दुसरेच काम दिले जाते, अशी तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. अपघातातील मृत व्यक्ती असिस्टंट सुपरवायझर असताना त्यांना वेल्डिंग विभागाचे काम देण्यात आले. सकाळी ते हजेरी लावून आपल्या कामावर निघाले होते. ते आपल्या दुचाकीने जात असताना परिसरात खाणीतील ट्रकच्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. त्यांना ट्रकमध्येच टाकून नेण्याची चर्चा होती. मात्र, वेकोली कर्मचाऱ्यांनी स्वतः रुग्णवाहिका बोलावून शिरभैये यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.