चंद्रपूर - काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या सातव्या यादीत विनायक बांगडे यांना चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकिटाच्या गोंधळात हायकमांडची बांगडे यांना पसंती मिळाली. त्यामुळेच काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते बांगडे यांना ही उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
बांगडे यांचे घराणे निष्ठावान काँग्रेसी आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जावे, यासाठी काँग्रेसमधील वडेट्टीवार गट प्रयत्न करत होता. मात्र, अनेक विनंत्या आणि समिकरणांचा विचार केल्यानंतर पक्षाने वडेट्टीवार गटाची मागणी धुडकावून लावली. यानंतर निवडणूक समितीने ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे बांगडे यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे या घडामोडीत बंडखोर शिवसेना आमदार धानोरकर यांना काँग्रेसने प्रवेश आणि तिकीट नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धानोरकर आता काय करणार याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बांगडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्याने काँग्रेसचे सर्व गट विजयासाठी कार्यरत होतील, अशी भावना काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आपण सत्ताधारी भाजपची चुकीची धोरणे जनतेपुढे ठेवू आणि कार्यकर्त्यांच्या साथीने विजय संपादन करू, असा विश्वास बांगडे यांनी व्यक्त केला.