चंद्रपूर - वन्यजीवांच्या सूक्ष्म हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ई सर्विलीयंस ही प्रणाली राबवण्यात येत आहे. यामध्ये एक थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एका पाणवठ्यात लपून बसलेल्या अजगराने तिथे पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाची शिकार केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाच्या मध्य चांदा क्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर तळ्यातील ही घटना आहे. हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. ही हरणे अत्यंत सावधपणे आजूबाजूच्या परिसराची चाहूल घेऊन पाणी पीत होती. मात्र, त्या पाण्यातच मृत्यू दडलेला आहे, याची त्यांना कल्पना देखील नव्हती. कळपातील एक हरीण पाणी पीत असताना अजगराने अचानक बाहेर येऊन हरणावर झडप घालून शिकार केली.
हेही वाचा- नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना
पाण्यात दडून राहून अजगर जमिनीवरील शिकार करतो, ही गोष्ट दुर्मिळ आहे. वनविभागाच्या या व्हिडिओत हा अजगर अचानकपणे हरणावर झडप घालतो, हा थरार कैद झाला आहे. हरीण स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. मात्र, अजगर त्याला अजीबात संधी देत नाही.