चंद्रपूर - कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांसाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तसेच जैन समाजाने मदतीचा हात पुढे केला आहे. या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू असलेल्या ७५० किट्स दोन्ही जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहे. येत्या १५ ऑगस्टला त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित होत आहे. मात्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे चित्र अत्यंत विदारक आहे. यापेक्षाही या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थिती आणखीनच भीषण आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत मिळण्यास अडचणी येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाने या पूरग्रस्तांना अल्पशी मदत देण्याचे ठरविले. त्यानुसार एका आठवड्याचा शिधा आणि आवश्यक लागणाऱ्या गोष्टी याच्या किट्स बनवून त्या पूरग्रस्त भागात पाठविण्याचा संकल्प केला. त्यानुसार किट्समध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो पीठ, २ किलो तूर डाळ, १ लिटर खाण्याचे तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, मेणबत्या, आगपेटी तसेच सोलापुरी चादर आणि एक ब्लँकेट अशा साहित्याचा यामध्ये समावेश आहे. आज या साहित्याचे दोन ट्रक सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाले असून जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसचे अशोक नागापुरे देवेन्द्र बेले यांच्यासोबत काँग्रेसचे कामगार संघटनेची एक चमू स्वतः या पूरग्रस्त भागात जाणार आहे. याबाबतची माहिती चंद्रपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली.