चंद्रपूर- बसस्थानकात एसटी बसेसची वर्दळ असते. बसची वाट बघणारे आणि सिट पकडण्यासाठी रुमाल टाकणारे प्रवासी बसस्थानकावर दिसतात. हे चित्र काही नवीन नाही. मात्र, कोरोनाने सिस्टीमची उलथापालत केली. दैनंदिन भाजीपाला बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी चक्क बसस्थानकातच भाजीपाला बाजार हलविला आहे. लाॕक डाऊनमध्ये ओस पडलेला बसस्थानकात या निमित्ताने नागरिक दिसू लागले आहे. हे चित्र पहील्यांदाच बघायला मिळत असल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
गोंडपिपरी शहराचा दैनदिन भाजीपाला बाजार जुन्या बसस्थानकाजवळ आहे. मुख्य मार्गाला लागून असलेल्या या ठिकाणी दुचाकी पार्किंगची सुविधा नाही. त्यातच अतिशय कमी जागेत हा बाजार भरतो. भाजीपाला खरेदी करताना ग्राहक गर्दी करतात. यामुळे सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. ही गंभीर बाब गोंडपिपरी नगरपंचायत प्रशासनाच्या लक्षात आली. कोरोनाचा पराभव होईपर्यंत नव्या जागेची नगरपंचयतीने पाहणी केली.
अखेर गोंडपिपरी बसस्थानकात भाजीपाला मार्केट भरविण्याचे निश्चित झाले. कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने गोंडपिपरी बसस्थानकही खाली होते. यामुळेच आजपासूनच या ठिकाणी दैनंदिन भाजीपाला बाजार भरायला सुरुवात झाली आहे. चांगलीच ऐसपैस जागा असलेल्या बसस्थानकात देखील खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यात योग्य अंतरावर ग्राहकांसाठी रंगाने आखणी केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोंडपिपरी नगरपंचयतीने कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आहे.
गोंडपिपरी पोलीस विभागाकडून देखील बसस्थानकाच्या प्रवेश द्वारावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. दुचाकीचालक बसस्थानकात जाणार नाही. या सोबतच खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जाणार याकडे पोलिसांची देखील करडी नजर असणार आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.