चंद्रपूर - सावली तालुक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारपाहिली या गावात बिबट्याच्या दहशतीत जिल्हा परिषदेची शाळा भरत आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासून बिबट्याचा या भागात थरार सुरु आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मागे बिबट्याने म्हशीच्या वासराची शिकार केली होती. गावकऱ्यांना या बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. बिबट्याच्या दहशतीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
हे ही वाचा - भोसे शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने वाचवले
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण 24 विद्यार्थी व एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडीतील एकूण 23 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेला सुरक्षा भिंत नसल्यामुळे अनुचित प्रसंग घडण्याची शक्यता आहे. भारपाहिली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले असून या गावात ६०० लोकांचे वास्तव्य आहे. जंगल परिसर अतिवृष्टि मुळे घनदाट झाला असून झाडे झुडूपे वाढली आहे. यामुळे जंगली प्राणी याचा फायदा घेत गावाजवळ फिरकत असतात. 22 ऑगस्टला किशोर दडिकवार यांच्या म्हशीच्या वासराची जिल्हा परिषद शाळेच्या मागे बिबट्याने शिकार केली. पुन्हा दोन दिवसांनी हा बिबट्या अनेकांना दिसला. शाळेला सुरक्षाभिंत नसल्यामुळे 47 विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे.
हे ही वाचा - मुंबई आयआयटी संकुलात बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण