चंद्रपूर - जिवती तालुक्यातील टिटवी या गावी राहणाऱ्या रिया मोतीराम मडावी (वय २ वर्ष) या चिमुरडीचा मृत्यृ झाल्याची घटना घडली. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करायचे होते. यावेळी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. पंरतु ती रुग्णवाहिका उशिरा आल्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण, अतिदुर्गम भागात अजूनही आरोग्य व्यवस्था खिळखिळी असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
मृत रियाची काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. रियाच्या वडिलांनी आज ( बुधवारी) तिला सकाळी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रियाला उपजिल्हा रुग्णालयात राजुरा येथे पाठविले. राजूरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक गंभीर असल्यामुळे रियाला सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले. रियाच्या पालकांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिकेला दीड तास उशीर होणार असे सांगण्यात आले.
गरीब परिस्थिती असल्यामुळे खासगी वाहनाने रियाला रुग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे 108 रुग्णवाहिका येईपर्यंत खूप उशीर झाल्याने दुपारी 3 वाजता वाटेतच रियाचा मृत्यू झाला. राजुरा पोलीस ठाण्यात डाॅ. कुलमेथे व सेवेवर असलेल्या नर्स माधुरी बोरकुटे, प्रियंका रघताठे यांच्या विरोधात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.