चंद्रपूर - जिल्ह्यातील राजूरा तालूक्यात आज (गुरुवार) दोन आत्महत्येच्या घटना समोर आली आहे. चूनाळा गावातील गजानन गोपाल कष्टी (वय ३५) या शेतकऱ्याने तर रामपूर ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करत असलेल्या नीलकंठ निकोडे (वय ४५) या दोघांनी आत्महत्या केली आहे. तर, दुसरीकडे आत्महत्येच्या दोन घटनांनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर येथील ग्रामपंचायतमध्ये शिपाई पदावर कार्यरत नीलकंठ लक्ष्मण निकोडे यांनी आपल्या राहत्या घरी पहाटे ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून नीलकंठ निकोडे हे मानसिक तणावात होते. तणाव असह्य झाल्याने त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई असा आप्तपरिवर आहे.
दूसऱ्या घटनेत चुनाळा येथील शेतकरी गजानन गोपाळा कष्टी यांनी आपल्या गोठ्यात सकाळी ११:३० वाजता विष घेऊन आत्महत्या केली. कष्टी यांच्या नावे चार एकर शेती असून त्यांच्यावर सहकारी सेवा संस्थेचे ८० हजार रुपयाचे कर्ज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बियाणांची जुळवाजुळव करताना त्यांना आर्थिक अडचण निर्माण होत होती. याच विवंचनेत सकाळी शेतात जाण्याच्या तयारीत असताना गोठ्यात कोणीही नसल्याचे पाहून कीटकनाशक औषध सेवन करुन कष्टी यांनी आत्महत्या केली. दरम्यान, सायंकाळी ४ वाजता काही कामानिमित्त गोठ्यात गेलेल्या व्यक्तीला कष्टी मृतावस्थेत दिसून आले. त्याच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत.