चंद्रपूर - वनविभागाने केलेल्या धडक कारवाईत वाघाची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी तशी कबुली दिली आहे. या कारवाईत आरोपींकडून वाघाची दोन दात आणि दहा वाघनखे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे हे आरोपी हे वाघाचे अवयव विकण्याची तयारी करीत होते. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही परिक्षेत्रातील रत्नापूर येथेस त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
3 नोव्हेंबरला वनविभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिंदेवाही परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रत्नापूर या गावातील बामन महादेव लोखंडे याच्या घरावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकली होती. घराच्या छतावर एक व्यक्ती अंधारात संशयितरित्या लपलेला आढळला. त्यास विचारणा केली असता, त्याने आरोपी संजय सुखदेव परचाके हा त्या ठिकाणावरून वाघाचे दाते व नखे घेवून पसार झाला असल्याची माहिती दिली. तेव्हा उपस्थित वनकर्मचाऱ्यांनी परचाके याच्या घरावर छापेमारी केली.
या कारवाईत परचाकेला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी वाघाचे 2 दात व 10 नखे असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी संजय परचाके (रा. रत्नापुर) यांने खताच्या खड्डयात लपवून ठेवलेले 2 दात व 10 नखे पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या वाघाची शिकार आरोपींनी विद्युत करंट देऊन केल्याचीही कबुली दिली. तसेच वाघाचे शीर आणि पंजे तोडून त्याचे दात व नखे काढून उर्वरीत धड नदीत फेकल्याचेही आरोपींनी स्पष्ट केले. याशिकार प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.