चंद्रपूर - शहराला लागून असलेल्या जुनोना गावात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. येथे गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेने हा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या प्रकरणात जुनोना गावाचे पोलीस पाटील यांच्या वडिलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. 30 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला होता.
गावालाच लागून हिवरे नावाच्या व्यक्तीचे शेत आहे. या शेतात असलेल्या घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. गावातील काही सतर्क लोकांनी तिथे जाऊन कानोसा घेतल्यावर आतून विचित्र अशा मंत्रोच्चारांचा आवाज येत होता. थोड्या वेळात आत असलेल्या व्यक्तींकडून बोलताना नरबळीचा देखील उल्लेख झाला. त्याच वेळी सतर्क नागरिकांनी त्या घरात प्रवेश केला आणि तेथील दृष्य पाहून सर्वच थक्क झाले. आत सर्व पूजेचे साहित्य पसरले होते.
हेही वाचा - विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी लावले प्राध्यपकांचे मासिक वेतन सांगणारे फलक
तसेच एक मांत्रिक, एक महिला, तिच्याजवळ एक लहान बाळ, अन्य दोन व्यक्ती आणि गावातील पोलीस पाटील जयपाल औरासेचे वडील नथू औरासे होते. यातील मांत्रिक हा यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. नरबळीचे बिंग फुटतात यातील एक महिला आणि दोन व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार झाले. हा संपूर्ण प्रकार नरबळीचा असल्याचा प्रत्यक्षदर्शी लोकांचा दावा आहे. तर या गंभीर प्रकारावर पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत नक्षलवादी-पोलीस चकमक; 2 नक्षलवादी ठार