चंद्रपूर - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. आज याबाबत आदिवासी महिलांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी बाळू धानोरकर, विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
राजुरा येथील एका आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या संस्थेचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष हे अध्यक्ष आहेत. या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी काल काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये धोटे यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केले. लैंगिक अत्याचार प्रकरणी आर्थिक मदत मिळत असल्या कारणाने पालक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत, असे त्यांनी म्हटले. वडेट्टीवार यांनीदेखील याची पाठराखण केली. त्यानंतर या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, आज आदिवासी महिलांनी याचा तीव्र निषेध केला. बाळू धानोरकर, सुभाष धोटे आणि विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमांना यावेळी जोडे मारण्यात आले. त्यांचे फलक जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.