चंद्रपूर - वाघांची वाढती संख्या आणि त्यातून होणारा मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय होऊन बसला आहे. वाघ आता चंद्रपूर शहराच्या नागरी वसाहतीकडे कूच करायला लागले आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात सलग दोन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच शहरातील हवेली गार्डन परिसरात ( Tiger spotted Haveli Garden area chandrapur ) वाघ मुक्तसंचार करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या वाघाला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना याबाबत सविस्तर कथन केले. ही बाब अत्यंत चिंताजनक असून नागरिकांच्या मनात धडकी भरविणारी आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वाघांचे नंदनवन
हमखास वाघाच्या दर्शनासाठी ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे जितके वाघ ताडोबात आहेत त्यापेक्षाही अधिक वाघ त्या आजूबाजूच्या परिसरात मुक्तसंचार करीत आहेत. त्यामुळे, दिवसागणिक जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. यात कधी मानवाचा तर, कधी वाघांचा बळी जात आहे. या प्रकल्पाला लागूनच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आहे. काटेरी झाडी, झुडपे, मोकाट जनावरे यामुळे वाघांसाठी हा परिसर नंदनवन ठरला आहे. या परिसरात अनेक वाघ, बिबटे आहेत. या परिसरातील झाडेझुडुपे हटविण्यात यावे, सुरक्षाभिंत उभारण्यात यावी, मोकाट जनावरे परिसरात फिरू देऊ नये, अशा अनेक सूचना वनविभागाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या व्यवस्थापनाला दिल्या, त्यातील काहींचे पालन झाले तर, काहींचे नाही. तर, वाघांवर नजर ठेवण्याची देखील वनविभागाकडे पूरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे, येथील कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
जिकडे तिकडे वाघच वाघ
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात दररोज राजरोसपणे वाघाचे दर्शन मागील काही दिवसांपासून होत होते. कामावर जात असताना, काम करीत असताना, परत येत असताना नेहमीच वाघ मुक्तसंचार करीत असताना दिसायचा. याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत होते. सोबतच जवळच्या राष्ट्रवादी नगरात देखील वाघ मुक्तसंचार करताना आढळून येत होता. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात जिकडे तिकडे वाघाचे दर्शन होत होते.
दोन दिवसांत दोन बळी
यापूर्वी वाघाने दुचाकीने जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यानंतर बुधवार 16 फेब्रुवारीला भोजराज मेश्राम हा 58 वर्षीय कर्मचारी आपल्या सायकलने रात्री परत येत असताना वाघाने त्याला उचलून नेले. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. तर, याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला दुर्गापूर परिसरात बिबट्याने 16 वर्षीय मुलगा राज भडकेला उचलून नेले. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला.
हवेली गार्डन परिसरात वाघाचा मुक्तसंचार
या घटनांची शाई वाळते न वाळते तोच चंद्रपूर शहरातील दाट वस्ती असलेल्या हवेली गार्डन परिसरात वाघ आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शनिवारी येथे राहणारे दोन युवक कौशिक टेप्पलवार आणि हर्षल अमृतकर रात्री दीडच्या सुमारास लोकमान्य टिळक विद्यालयाच्या रस्त्याने आपल्या खोलीकडे परत येत असताना अचानक त्यांना समोरच्या रोडवरून वाघ येताना दिसला. हे बघून दोघांचीही बोबडी वळाली. ते मागे पळत सुटले. त्यांनी आपला मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जात असताना पुन्हा त्यांना 50 फुटांवर दुसऱ्यांदा वाघाचे दर्शन झाले. तब्बल दहा मिनिटे हा वाघ तिथे होता. त्यानंतर झाडी झुडुपांकडे तो चालला गेला.
तीन वर्षांपूर्वी देखील वाघाचे दर्शन
तीन वर्षांपूर्वी देखील या परिसरात वाघाचे दर्शन काही लोकांना झाले होते. इराई नदीच्या मार्गे हा वाघ इथे आला होता. आधी पडोली, मग कोसारा, दाताळा, हवेली गार्डन आणि पठाणपुरा परिसरात अनुक्रमे हा वाघ दिसला होता. तेव्हा हवेली गार्डन परिसरात वनविभागाने दररोज गस्त लावली होती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात होता. काही वनकर्मचारी तैनात केले होते. मात्र, पूर्वी हा वाघ केवळ नदीच्या आसपास दिसत होता. आता मात्र तो थेट दाट नागरी वस्तीत दिसला. त्यामुळे, चिंता वाढली आहे. जिथे वाघ दिसला त्या परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. लोक मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी फिरायला जातात. अशावेळी मोठी घटना घडू शकते. याची माहिती काही जागरूक लोकांनी इको-प्रो संघटनेचे संस्थापक बंडू धोत्रे यांना दिली आहे. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. ही बाब समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.