चंद्रपूर - कोंबड्यांची जिवघेणी झुंज भरवून त्यावर सट्टा लावणे हे कायद्याने गुन्हा असताना जिल्ह्यात मात्र, याचा सुकाळ सुरू आहे. कायद्याचा कुठलाही धाक मनात न ठेवता हा कोंबडबाजार सर्रासपणे सुरू आहे. राजुरा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्वी या ठिकाणी तर एखादी यात्रा भरावी अशाप्रकारे हा कोंबडबाजार थाटला जात आहे. आठवड्यातून चार दिवस तो चालवला जातो. कोंबड्यांच्या झुंजीवर लाखो रुपयांचा जुगार खेळला जातो. यासाठी मोठी गर्दी जमते. लगतच्या तेलंगणा राज्यातून देखील येथे काही शौकीन लोक येतात. या बाजाराची एक दिवसांची उलाढाल ही जवळपास एक कोटीच्या घरात आहे. इतका मोठा अवैध धंद्याचा बाजार येथे सजवला जात असताना पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे. अद्याप यावर कुठलीही मोठी कारवाई झालेली नाही. गोलू नामक व्यक्ती हा कोंबडबाजार चालवत असून या व्यक्तीला राजकीय वरदहस्त आहे. पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या गोलू नामक व्यक्तीने पोलीस प्रशासनासोबतही हातमिळवणी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह -
प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले की हे धंदे आणखी फोफावत जातात. यातूनच मग या धंद्यातीला माफिया तयार होतात. त्यांचे राजकीय संबंध जुळतात. हे व्यक्ती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी आर्थिक संबध ठेऊन त्यांना खिशात घेऊन फिरल्याच्या अविर्भावात असतात. आपले आता कोणीही काहीच वाकडे करू शकत नाही, असे म्हणत हे कायदे सर्रास तुडवतात. यातून सामाजिक वातावरण बिघडते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. दुर्दैवाने अलीकडे चंद्रपुरात हेच चित्र दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात कोंबडबाजाराच्या धंद्याला उत आला आहे. छोट्यामोठ्या पद्धतीने लपून-छपून हे धंदे चालतात. मात्र, राजुरा तालुक्यातील आर्वी येथे हा धंदा सर्रासपणे सुरू आहे. कायद्याचा कुठलाही धाक न ठेवता येथे कोंबडबाजार भरवला जात आहे. कोंबडबाजारासोबतच येथे जुगारही खेळवला जातो. रात्री उशिरापर्यंत हा जुगार चालतो. प्रत्येकालाच ही गोष्ट माहीत आहे. मात्र, पोलीस प्रशासन यावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. कारण गोलू नामक व्यक्ती हा बाजार भरवत आहे. त्याची एका स्थानिक नेत्यासोबत जवळीक आहे. हा सर्व व्याप राजकीय वरदहस्त आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. म्हणूनच त्यावर थातुरमातुर कारवाई केली जात आहे. कारवाई होण्याआधीच त्याची माहिती या गोलूला असते. या प्रकारातून पोलीस विभागाची प्रतिमा देखील मलिन होत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
दिवाळीनंतर आर्वी येथील एका पडीक जमिनीवर हा कोंबडबाजार भरविण्यास सुरुवात झाली. ही जागा गडचांदूर मार्गावरून अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे. तिथे चारचाकी वाहने पोचण्यासाठी गोलुने जेसीबीने रस्ता तयार केला. त्यावर मुरूम टाकला. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असा आठवड्यातून चार दिवस हा बाजार भरतो. सकाळी आठ वाजल्यापासून तो सुरू होतो. सायंकाळी पाचपर्यंत कोंबड्यांची जीवघेणी लढत होते. त्यासाठी कुस्ती खेळात जसा आखाडा असतो तशी सोय केली आहे. त्याच्या चारही बाजूला लोखंडी जाळ्याचे कुंपण करण्यात आले आहे. दर पाच मिनिटांत येथे कोंबड्यांची जीवघेणी लढत लावली जाते, त्यावर लाखोंची बोली लावली जाते. त्यात मारले गेलेल्या कोंबड्यांची येथेच विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी विशेष खाटीक आणि खानसामा असतो. या लढाऊ कोंबड्याच्या मांसालाही मोठी मागणी असते. पैसे देऊन येथेच त्याची चव चाखता येते. सोबत येथे दारूची देखील विक्री केली जाते. सायंकाळी पाच नंतर येथे जुगार होतो. ज्याच्या खिशात किमान दोन लाख रुपये आहेत त्यालाच येथे बसण्याची परवानगी असते. हा जुगार रात्री उशिरापर्यंत खेळला जातो. यासाठी तेलंगाणा राज्यातून अनेक शौकीन लोक येतात, अशी धक्कादायक माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे.
ऑनलाईनही व्यवहारासाठी फोनपे, गुगल पेची सुविधा !
या कोंबडबाजारात चक्क डिजिटल बँकिंगचाही उपायोग केला जात आहे. त्यामुळे ही अवैध यंत्रणा किती आधुनिक आहे याची प्रचिती येते. फोनपे आणि गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही थेट येथे जुगार खेळू शकता.
शाळकरी मुलांचा वावर -
इतका मोठा व्याप सांभाळण्यासाठी तीस ते चाळीस लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे. सोबत काही शाळकरी मुलांचा देखील वापर येथे होत आहे. बाजारात काही संशयास्पद हालचाली होत आहेत का, कोणी आपल्या मोबाइलमधून याचे चित्रीकरण करत आहे का यावर बारिक लक्ष ठेवण्यासाठी या मुलांचा वापर होतो. यासाठी त्यांना पैसे दिले जातात.
शेतकऱ्यांचे नुकसान -
या बाजाराच्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. येथे चारचाकी, दुचाकींची सतत वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याची तक्रार करू नये म्हणून त्यांनाही पैसे देऊन गप्प केले जाते.
दहशत पसरवून अवैध व्यवसाय -
हा संपूर्ण धंदा दहशतीवर चालवण्यात येत आहे. कोणी याची तक्रार आणि वाच्यता केल्यास त्याला मारहाण केली जाते. गोलूला राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त प्राप्त आहे. त्यामुळे तक्रार करावी तर कुठे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. रविवारी काही युवक या कोंबडबाजाराचे चित्रीकरण करताना दिसले असता त्यांचा फोन जप्त करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हे प्रकरण राजुरा पोलीस ठाण्यात पोचले. यावेळी देखील या युवकांना धमकी देण्यात आली. त्यांना तक्रार मागे घेण्यास दबाव टाकण्यात आला. अखेर आपसी चर्चेत तोडगा काढून हे प्रकरण मिटवण्यात आले. याची पोलिसांनी कुठलीही तक्रार दाखल केली नाही. हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे.