चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन मध्ये वाघाचे तीन बछडे अशक्त अवस्थेत आढळले. ताडोबातील कर्मचाऱ्यांनी या बछड्यांना चंद्रपूर येथील उपचार केंद्रात आणले. मात्र त्यातील एका बछड्याची हालत गंभीर असल्यामुळे त्याने वाटेतच प्राण सोडले. इतर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. या बछड्यांच्या वाघिणीचा शोध घेणे सध्या सुरू आहे.
बछड्याचे शवविच्छेदन करून दहन
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रातील खडसंगी वनक्षेत्र येथे 27 ऑक्टोबरला कर्मचारी गस्ती घालण्यास गेले होते. दरम्यान त्यांना वाघिणीचे तीन बछडे अशक्त अवस्थेत आढळून आले. त्यानंतर या बछड्यांवर ताडोबाच्या कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. 28 तारखेला यातील एक बछडा अत्यंत अशक्त स्थितीत आढळून आला. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रांसिट सेंटर येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे व्याघ्र संवर्धनाच्या नियमानुसार या बछड्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.
29 ऑक्टोबरला उर्वरित दोन बछडे आढळून आले त्या दोघांना देखील चंद्रपूर उपचार केंद्रात आणण्यात आले. ताडोबा बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्या वाघिणीचा शोध घेणे सध्या सुरू आहे.
हेही वाचा- घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?
यापूर्वी देखील एक बछडा आढळला होता
यापूर्वी सुशी दाबगाव येथे असाच एक बछडा आढळला होता. या वाघिणीला शोधण्यासाठी अनेक दिवस गेले. मात्र वाघीण आणि बछड्याचे मिलन होऊ शकले नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही फसल्याने अखेर बछड्याला उपचार केंद्रात ठेवण्यात आलेले.
यापूर्वी जून महीण्यात वाघीण मृतावस्थेत आढळली होती
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहूरली बफर झोनमधील सितारामपेठ या बिटात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. घटनास्थळापासून तलाव अवघ्या काही अंतरावर आहे. रविवारी दुपारी घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. सोबत दोन वानरे देखील घटनास्थळी मृतावस्थेत आढळली. हे बछडे याच वाघिणीचे असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती आहे.
हेही वाचा- धक्कदायक! आईच्या कुशीतील बाळ बिबट्याने नेले हिसकावून, आईची झुंज अपयशी