चिमूर (चंद्रपूर)- तालुक्यातील झरी येथील गुलाब शेंडे आणि दिवाकर शेंडे या दोघाही भावांचे घर मागील वर्षी पावसाळ्यात पडले. मात्र, घरी अठरा विश्व दारिद्र्य असल्याने ते घर बांधू शकले नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा घरकुल योजनेचा लाभ मिळलेला नाही. गुलाब शेंडे, दिवाकर शेंडे व गुलाब यांचा मुलगा दयाराम यांनी समाज मंदिरात संसार थाटला आहे. शेंडे कुटुंबीय कुणी घर देते का घर, अशी याचना समाज व शासनाला करत आहेत .
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेले पाचशे लोकवस्ती असलेले झरी मंगरुड हे गाव आहे .या गावाचा समावेश बंदर (शिवापूर) गट ग्रामपंचायतीमध्ये होतो. येथे दिवाकर शेंडे व गुलाब शेंडे हे दोन भाऊ व मूलगा अल्पशी शेती, शेतमजूरी तथा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वडिलोपार्जीत मोडकळीस आलेल्या घराच्या आसऱ्याने ते राहत होते. मात्र, हाही आसरा मागील वर्षीच्या मुसळधार पावसाने पडल्याने शेंडे कुटुंबियांना बेघर व्हावे लागले. त्यावेळेपासून ते गावातील समाज मंदिरात राहत आहेत.
पडलेल्या घराचे व झालेल्या सर्व नुकसानीचा महसूल विभागाने तलाठी, ग्रामसेवक मार्फत पंचनामा केला. मात्र, एक वर्षाचा कालावधी लोटून गेला तरी एक पैशाचीही साधी मदत शासनाकडून मिळालेली नाही. तर ग्रामपंचायतीकडे या तिन्ही कुटुंबातील प्रमुखांनी घरकुलासाठी अर्ज सादर केले. मात्र,या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. अजून किती दिवस शेंडे कुटुंबांना हक्काच्या घराची वाट पाहत समाज मंदिरात राहावे लागणार हा प्रश्न आहे.