चंद्रपूर : सावली तालुक्यातील मेहा बूज परिसरात वाघाची दहशत आहे. आज दोन वाघांनी गुरांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जनावरे ठार झाली आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
सावली तालुक्यातील पाथरी वनपरिक्षेत्रात मेहा हे गाव आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांपासून वाघांचा वावर आहे. आज येथील एक गुराखी आपल्या जनावरांना घेऊन जंगलात चराईसाठी गेला होता. यावेळी तेथील दोन वाघांनी कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वाघांनी तीन जनावरांचा जागीच फरशा पाडला तर एक जनावर गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात सुरेश गंडाटे, प्रकाश कोलेते, राजेंद्र कोलते, महेंद्र ठाकरे यांच्या जनावरांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनविकास महामंडळच्या पाथरी विभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. या वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.