चिमूर (चंद्रपूर) - चिमूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत चिमूर येथे सापळा रचून वाघाच्या मिशा विकताना बालाजी परसराम सिडाम (रा.कोलारा) याला रंगेहात अटक केली. चौकशीत त्याने ऊसेगाव येथील राजु सुखदास पिल्लेवान व दिलीप तुकाराम पिल्लेवान यांचेकडे जंगली डुकराचे दात असल्याची माहिती दिली. त्यावरून या दोघानाही जंगली डूकराच्या दातासह अटक करण्यात आली.
चिमूर तालुक्यालगत असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगल क्षेत्रात वाघांचे व तृणभक्षी प्राण्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनाचे कठोर नियम असतानाही काही प्रमाणात शिकार होतच असल्याचे दिसून येते. ताडोबा जंगल क्षेत्रालगत असलेल्या कोलारा येथील बालाजी परसराम सिडाम यांच्याकडे वाघाच्या मिशा असून ते विकण्यासाठी चिमूर येथे येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाने एक बनावट ग्राहक पाठवून मिशाचा सौदा केला. तेव्हा बालाजीकडे वाघाच्या तीन मिशा असल्याचे निदर्शनास आले. त्याला अटक करून वनविभाग कार्यालय येथे आणले.
बालाजी सिडाम याची सखोल चौकशी केली असता त्याच्या दोन सहकाऱ्याकडे जंगली डुकराचे दात असल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारावर चिमूर वनविभागाने तालुक्यातील उसेगाव येथे राजू सुखदास पिल्लेवान व दिलीप तुकाराम पिल्लेवान यांच्या घरी छापा मारून डुकराचे दात जप्त केले. या तिघांनाही वन विभागाने अटक केली असून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या मिश्या व डुकराचे दात कुठून आले याची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवडे ,वनपाल गायकवाड ,एन. बी. उडगे ,वनरक्षक एन. पी. राठोड, एस. एम. हाडवे,के. ए. गायकवाड, एच.पी.भैसारे, मोरे आदींनी केली.