चंद्रपूर - संचारबंदीच्या काळातही चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू येत आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल 32 लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
बाहेर जिल्ह्यातून घुग्गूसमार्गे मोठ्या प्रमाणात दारू येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार धानोरा फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. एक पिकअप वाहन (एमएच ४० बीजी ३२८९) थांबवून तपासणी केली असता त्यात तब्बल २७० पेट्या देशी दारू आढळून आली, ज्याची किंमत 27 लाख एवढी आहे. तसेच वाहनाची किंमत ५ लाख, असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात वाहनचालक कपील रामदास वेलतूरकर याला अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार झाले. ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे, पंडित वऱ्हाडे, पद्माकर भोयर, नितिन जाधव, अमोल धंदरे, नितिन रायपुरे यांनी केली.
मग त्या चौकीचा काय उपयोग?
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. बाहेर जिल्ह्यातील दारू चंद्रपूर जिल्ह्यात येऊ नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस चौकी लावण्यात आली आहे. येथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनाची तपासणी केली जाते. यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावर एक चौकी आहे. येथे २४ तास पोलिसांचा पहारा असतो. असे असतानाही दारूने भरलेला ट्रक आत आला कसा? हा खरा प्रश्न आहे. मग यापूर्वी देखील असाच प्रकार सुरू होता का? त्यासाठी काही विशेष सूट देण्यात येत होती का? हा देखील महत्वाचा मुद्दा आहे.