राजूरा (चंद्रपूर) - दोन जूळ्या मुली आणि त्यांच्या आईने बारावीची परिक्षा दिली. निकाल हाती आला अन घर आनंदाने भरून गेले. मुलींनी परिक्षेत यश मिळवीलेच त्यांच्या सोबती आईनेही यश गाठले. चूल आणि मुलं सांभाळत आईने मिळविले शैक्षणिक यश मुलींना उर्जा देणारे ठरले आहे. या सूपर मॉमवर आता कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. कल्पना देविदास मांदळे, असे यश गाठणाऱ्या आईचे नाव आहे. त्या कोरपणा तालुक्यात येणाऱ्या आवाळपूर येथील रहिवासी आहेत.
शिक्षणासाठी वयाचे बंधन नाही. हे सिध्द करुन दाखविणार्या कल्पना मांदाळे या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येत असलेल्या आवाळपूर येथील रहीवासी आहेत. त्यांना दोन जूळ्या मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या, अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मुली दहावीला असताना कल्पना यांनीही दहावीची परिक्षा दिली होती. मुलीसोबत त्यांनी दहावीच्या परिक्षेतही यश संपादन केले. लग्नानंतरही त्यांची शिक्षणाची आवड कमी झाली नव्हती. याच आवडीतून त्यांनी कुंटूबियांना सांभाळत पुस्तकांशी मैत्रीचे नाते कायम ठेवले होते. मुलीसोबत विद्यार्थी बनून त्याही शाळा गाठायचा. जिवती येथील प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाचा त्या विद्यार्थी होत्या. दहावी नंतरही त्यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरची कामे उरकवून त्या अभ्यास करायचा. त्यामुळे निकालाची कुटूंबियांना आतूरता लागली होती.
निकाल हाती आला आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले. बारावीच्या परिक्षेत दोन्ही मुलींनी बाजी मारली होती.तर आई कल्पना यांनीही यश संपादन केले. 58 टक्के गुण घेऊन कल्पनांनी यश मिळविले. चूल आणि मुल ऐवढ्यापुरतेच मर्यादित न राहता कुटूंबाची जवाबदारी पेलतांना मिळविलेल्या शैक्षणिक यशाने कल्पना यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.