चंद्रपूर - चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडसंगी मुरुपार मार्गावरील खोडदा नदी बंधाऱ्यातील खोल पाण्यात पहाटेच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेशकुमार आसुराम चौधरी (वय 22 वर्षे, रा. आहवेलिसीयार, जि. नागोर, राजस्थान) असे मृत युवकाचे नाव आहे.
मृत सुरेशकुमार हा मागील ४ महिन्यांपासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावात राहत होता. दरम्यान, तो खडसंगी येथे राहत असलेल्या चुलत भावाकडे येत जात होता. रविवारी सकाळी तो खडसंगी येथे आपल्या चुलत भावाकडे आला होता. पण, सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या चुलत भावाने शोधाशोध केली असता त्याला खडसंगी-मुरुपार मार्गावरील जंगलात असलेल्या खोडदा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याजवळ त्यांची चप्पल व इतर साहित्य आढळून आले होते. या प्रकाराची माहिती त्यांनी चिमूर पोलिसांना कळवली होती. सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून घटनेचा पुढील तपास स्वप्नील धुळे करीत आहे.
आत्महत्या की घातपात ?
मृताच्या नातेवाईकांनी चंदनखेडा येथून निघताना ४० हजार रुपये असल्याची माहिती दिली. पण, घटनास्थळी त्याचा मोबाइल, चप्पल, जाकेट, पाकीटात दोनशे रुपये आढळून आले. व्यवसायानिमित्ताने मूळ गाव सोडून या परिसरातील आलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या जवळची ४० हजारांची रक्कम आढळली नसल्याने आत्महत्या की घातपात, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त करीत आहेत.