चंद्रपूर - स्वतंत्र भारताच्या जनगणनेत अद्यापही इतर मागासवर्गाची मोजणी करण्यात आलेली नाही. जर ही आकडेवारी माहितीच झाली नाही तर या वर्गाची आजवर काय स्थिती आहे, हे देखील कळणार नाही. त्यामुळे जनगणनेत इतर मागासवर्गीय नागरिकांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने खासदार बाळू धानोरकर यांना देण्यात आले आहे.
देशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्यावश्यक आहे. 1933 साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती. तेव्हा फक्त एकदाच ओबीसींची गणना करण्यात आली होती. त्या वेळी देशात 54 टक्के ओबीसी समाज असल्याचे स्पष्ट झाले होते. आरक्षण देताना त्याच्या अर्धे 27 टक्के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले. मात्र, सध्या देशभरात ओबीसी समाज नेमका किती आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.
केंद्र पातळीवर जितक्या समित्या नेमण्यात आल्या किंवा विविध न्यायालयात याच्याशी संबंधित जितके विषय आले, त्यामध्ये ओबीसी समाजाची आकडेवारी मागण्यात आली आहे. मात्र ती उपलब्ध नाही. आता सन 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना देखील नाही. तो असायला हवा. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघाने खासदार बाळू धानोरकर यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, चंद्रपूर तालुका अध्यक्ष गोविल मेहरकुरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष शिरीष तपासे, एस. पी वाढई, गिरीश इटनकर, भाग्यश्री पाटील, भूपेंद्र खनके, के. एस. रहाटे, डी. एस. वाघमारे, एस. बी. ठाकरे, गणेश खोब्रागडे उपस्थित होते.