चंद्रपूर - बीटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावात शिक्षकांसह केंद्रप्रमुखांना मारहाण करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावकऱ्यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी पोलीस सरंक्षणात खेळ खेळवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत भंगाराम तळोधी बीटमध्ये शालेय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव मंगळवारपासून सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास धामणगाव व सालेझरी या गावातील शाळाअंतर्गत खो-खोचे सामने सुरू करण्यात आले. याचदरम्यान पंचांच्या निकालावरून चांगलाच वाद झाला. यावेळेस सालेझरी येथील शिक्षक येनगंटीवार व भंगाराम तळोधी बीटचे केद्रप्रमुख मुत्यलवार यांना मारहाण करण्यात आली. याप्रकाराची माहिती होताच संपूर्ण तालुक्यात याची चर्चा रंगू लागली आहे. यानंतर बराच काळ वातावरण तणावपूर्ण होते.
दरम्यान, गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गोंडपिपरी पंचायत समिती प्रशासन हल्ली कुंभकर्णी झोपेत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसात विविध वादग्रस्त घटना घडू लागल्या आहेत. अशातच आज धामणगावात ही घटना घडल्याने प्रशासनाच्या नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा - ऐ भाई...जरा रस्ता दे...! एकीकडे महामार्गाचे बांधकाम, दुसरीकडे अतिक्रमण; वाहनचालकांना मनस्ताप