चंद्रपूर - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता पर्यटनासाठी खुला होणार आहे. येत्या 1 जुलैपासून ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटकांना जंगलभ्रमंती करता येणार आहे. मात्र, ताडोबात जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना स्वतःची कोरोनाविषयक काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.
पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वतःचा मास्क, सॅनिटायझर वापरावे लागेल. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील एकूण 13 प्रवेशद्वारांमधून पर्यटकांना सफारी करता येईल. प्रत्येक प्रवेशद्वारावर 'डिजिटल थर्मामीटर द्वारे पर्यटकांची तपासणी केली जाणार असून, पर्यटकांना तापाची लक्षणे दिसल्यास त्या पर्यटकास जंगलभ्रमंतीपासून रोखले जाणार आहे.यासह अन्य अटी व शर्तीवर ताडोबातील बफर झोन पर्यटनासाठी सुरू करण्यात आले आहे.
शासनस्तरावरून कोअर झोनमध्ये पर्यटनास बंदी असून, केवळ बफर क्षेत्रात पर्यटनास मुभा देण्यात आली आहे. बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करताना प्रत्येक प्रवेशद्वारावरून 6 जिप्सी सोडल्या जातील. त्यात 4 बफर व 2 कोअर झोनच्या जिप्सींचा समावेश राहील. कोअर झोन बंद असल्याने त्या क्षेत्रातील जिप्सी चालक मार्गदर्शकांना रोजगार प्राप्त व्हावा, हा यामागील उद्देश आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 मार्चपासून ताडोबा प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्यात आला. मागील तीन महिन्यांपासून जवळपास साडेतीन कोटीहून अधिक नुकसान ताडोबा प्रशासनाला सहन करावे लागले. शिवाय जिप्सी चालक, गाईड्ससह अन्य लोकांचाही रोजगार बुडाला होता. या निर्णयाने जिप्सी चालक, गाईड्स, ताडोबा प्रकल्पावर अवलंबून असलेले नागरिक, निसर्गप्रेमी, पर्यटकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.