चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ( Tadoba Tiger Project ) काम करणारे गाईड्स आंदोलनाच्या ( Tadoba Guide Agitation ) तयारीत आहे. त्यांनी आपल्या मागण्यांचे पत्र ताडोबा व्यवस्थापनाला पाठवले होते. मात्र, व्यवस्थापनाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 11 मे रोजी ही संघटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करणार आहेत. या संघटनेच्या दहा मागण्या आहेत. त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 11 तारखेला प्रातिनिधीक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाने दिला आहे.
'प्रतिसाद दिला नाही म्हणून आंदोलन' - आम्ही पत्रव्यवहार केला. क्षेत्र संचाकल डॉ. रामगावकर यांच्याशी चर्चाही केली. मात्र, यातून कुठलाच तोडगा निघाला नाही. ग्रेड पद्धती ही आमच्यासाठी अन्यायकारक आहे, याची स्पष्टता नाही. एकदा ग्रेड मिळाला की त्या गाईडला तेवढेच मानधन दिले जाते. हा ग्रेड वाढविण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही. आम्ही जीव धोक्यात घालून काम करतो, अशावेळी काही अप्रिय घटना घडली, तर आमच्यासाठी कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नाही, त्यामुळे आमचा विमा काढणे आवश्यक आहे. असे अनेक प्रश्न आमचे आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून आम्ही आंदोलनाचा पवित्रा आता घेतला आहे, अशी माहिती अभयारण्य गाईड कर्मचारी संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पवन कनोजे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. याबाबत ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
काय आहेत मागण्या -
- सचिन गेडाम या गाईडला जुन्या रेकॉर्डनुसार सेवेत घेण्यात यावे.
- केसलाघाट सफारी गेट मधील सर्व गाईड व जिप्सी चालक व इतर कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे.
- गाईडचे ग्रेडेशन रद्द करण्यात यावे.
- सर्व कामगारांना वेतन स्लिप देण्यात यावे व पीएफ कपात करण्यात यावे.
- गाईड (मार्गदर्शक) यांना पूर्वीचा गणवेश देण्यात यावे.
- सर्व गाईड्स कामगारांना समान वेतन देण्यात यावे तसेच वनविभागाकडून ग्रुप इन्शुरन्स काढण्यात यावे.
- गाईड कामगारांना बुधवार हा दिवस श्रमदान ईच्छुक असावा.
- ताडोबा पर्यटक बुकिंग वेबसाईट शासनाची असावी ती खासगी नको.
- पिढ्यानपिढ्या जे आदिवासी व इतर समाज जंगलात शेती करून आपला परिवाराचे उदरनिर्वाह करत आहेत व वन विभागात गाईड व जिप्सी चालक व इतर काम करीत आहेत यांना जागा व काम सोडण्याचे सक्ती करण्यात येऊ नये.
- बंद असलेला तिरकडा गेट त्वरित सुरू करण्यात यावा, त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल.